प्राचीन काळापासून मानव शक्तीची उपासना करीत आला आहे. मानवी जीवनात शक्ती उपासनेला विशेष महत्व आहे. श्री जगदंबेची ५१ शक्तिपीठे भूतलावर असून उपासकांना त्यामुळे त्याचा लाभ झालेला आहे. या शक्तीपिठापैकीच “श्री महाकाली श्री महालक्ष्मी श्री महासरस्वती” या तिन्ही स्थानाचे त्रिगुणात्मक साक्षात ब्रम्हस्वरूपीणी ओंकार स्वरूपात अधिष्ठित आहे आणि तेच म्हणजे कोटमगाव येथील श्री जगदंबा माता होय.
कोटमगाव ता. येवला येथील देवीची एक आख्यायिका आहे. ती अशी, महासती वृंदा हिचा पती दैत्यराज जालींधर हा सती वृंदाच्या प्रभावाने त्रिलोकी विजयी झाला. त्याला अपयश माहित नव्हते. सती वृंदाच्या तपसामर्थ्याने अपयश न आल्याने त्याने सामांध होऊन देवलोकावर स्वारी केली. त्यामुळे सर्व देवांनी श्री विष्णूचा धावा केला. श्री विष्णूंनी जालींधराच्या यशाचे सामर्थ्य सती वृंदेचे सतीत्व असल्याचे ओळखले व सर्व देवांच्या रक्षणासाठी श्री भगवान विष्णूंनी जालींधराचे रूप धारण केले व सतीचे शील हरण केले. शिलहरण झाल्याबरोबर दैत्यराज जालींधर पराभूत झाला व त्याचा मृत्यू झाला. जालींधराचा मृत्यू झाल्या बरोबर सतीने श्री विष्णूंना ओळखले व तुम्ही शालीग्राम होऊन पडाल असा शाप दिला शापाने श्री विष्णू शालीग्राम होऊन कोटमगावी पडले.श्री विष्णूंचा शोध करीत देवी श्री महलक्ष्मी, श्री महासरस्वती यांच्याकडे गेल्या तेथे श्री विष्णू नसल्याने दोघी परत श्री महाकालीकडे गेल्या तेथेही श्री विष्णू नसल्याने तिघीही शोधावयास निघाल्या आणि शोधता शोधता तिघींना श्री विष्णू कोटमगावी शालीग्राम रुपात दिसले. त्यांनी सती वृंदेचा उद्धार करून श्री विष्णूंना शाप मुक्त केले आणि तिघींनी ह्या स्थळी म्हणजे कोटमगाव येथे रज तम आणि साम अशा त्रिगुणात्मक रुपात वास करू लागल्या व मग या त्रिगुणात्मक गुप्तरूप एका नांगरणाऱ्या शेतकऱ्याच्या माध्यमातून अवतीर्ण झाल्या, असे हे जगदंबा मातेचे स्थान.